विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याला आज (१४ जानेवारी) बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात सरकारी वकिलांनी वाल्मिकची सीआयडी कोठडी मागितली होती. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख आरोपी आहे. या हत्या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूला चालू आहे.
सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील कराडवर आरोप केले आहेत. त्यामुळे कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी विरोधक करत होते. या हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे.
दरम्यान, वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत.