विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमच्या हातात दोन तास ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षांतर घडवून आणली जात असल्याचा आरोप केला आहे. ( Give ED and CBI in our hands, Amit Shah will also join Shiv Sena!)
राऊत म्हणाले, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने, सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही. कसले ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन. उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल. दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये द्या. बावनकुळे यांच्यापासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारामध्ये दिसतील.
तुम्ही उंदरासारखे पळून जातात. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा देऊन राऊत म्हणाले, राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना 18 हजा मताधिक्य होते. राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात मग ते स्वतःला मताधिक्य का नाही मिळू शकले ? राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते. आमदार, उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्त्वाची पद दिली. सर्व काही दिलं. पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात. सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते. निवडणूक हरून देखील राहिले असते.
भास्कर जाधव यांच्या नाराजीवर राऊत म्हणाले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या पसरवतात किंवा देतात त्या पूर्णपणे चुकीच्या असतात. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे . त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला . मी त्यांना सुचवलं ऑनलाईन मधून चर्चा करू. पण मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे.
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो. आमच्या पक्षात तेवढी लोकशाही आहे .ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला, असा टोलाही राऊत यांनी मारला.
रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्या कथित संपत्तीवरून मला तोंड उघडायला लावू नका असा इशारा दिला आहे. त्यावर राऊत म्हणाले, दुसऱ्यांना तोंड नाहीत का, तोंड सगळ्यांना आहेत जो बाडगा असतो तो जोरात बांगतो. त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ज्या उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पद आणि वैभव दिलं त्यांच्याविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे नैतिकतेला धरून आणि माणुसकीला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या. मग अशा प्रकारचे विधाने करा. कधी कळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. आपण त्यांच्याबरोबर तासनतास बसून चर्चा केली आहे. आमदारकी आणि मंत्री बदल मिळवली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर याच उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं होतं.