विशेष प्रतिनिधी
पुणे: जर का उद्योजकांना खंडणीसाठी कुणा माफियाने किंवा गुंडाने धमकी दिल्यास त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन त्यावर बोलावे. सरकार त्या उद्योजकांना संरक्षण देईल. दहशत माजवणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
समाजकंटकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर सामंत म्हणाले, उद्योजक जर पुढे आले नाहीत तर सुमुटो पद्धतीने खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल.
माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी माथाडी चळवळ उभी राहिली. परंतु माथाडी चळवळीच्या पाठीमागून जे खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत, ती निपटून काढणे गरजेचे आहे. परदेशी गुंतवणूक करण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर परदेशी उद्योजकांनी पुण्यात उद्योग उभारावेत यासाठी एक नवीन पॉलिसी तयार करण्यात येणार असल्याचे देखील सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात उद्योजकांना अनेक ठिकाणी खंडणीसाठी काही लोक फोन करतात, मग अशा वातावरणात महाराष्ट्रात उद्योजक कसे राहतील? अशा आशयाचा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना विचारला. यावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, “अशी प्रवृत्ती मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे. जो उद्योजक येतो तो अनेकांना रोजगार देत असतो बेरोजगारी दूर करत असतो. एखादया उद्योजकाला जर कोणी जाणीवपूर्वक त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी देखील प्रशासन आहे.
जाणीवपूर्वक खंडणी मागण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्या उद्योजकानं पुढे यावं, त्या उद्योजकाला संरक्षण दिलं जाईल. तसंच जी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात खंडणी मागण्याचा प्रयत्न करते आहे, त्यांना जेलचीच हवा भोगावी लागेल.