विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी फडणवीस साहेबांना पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा अशी विनंती करणार आहे, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
स्वारगेट बलात्कार घटनेवर राणे म्हणाले, ज्यांच्या डोक्यात हे असे विचार येतात, त्यामुळे आता समाजात हे असले लोक नको. त्यामुळे मी विनंती करणार आहे की एन्काऊंटर स्कॉड परत आणा. काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार करा. त्यांच्यावर काही बंधने घाला. अशा लोकांना समाजात ठेवणं हे योग्य नाही. एकदा जेलमधून बाहेर आल्यानंतर ते परत तेच करणार आहेत. ( Time to bring back encounter squad, Nilesh Rane’s demand to CM over Swargate rape incident)
आम्ही नेहमी म्हणतो काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर स्कॉड होता, अशा लोकांसाठी एन्काऊंटर स्कॉड परत आणण्याची वेळ आली आहे, असं वाटत आहे. एन्काऊंटर केल्याशिवाय आणि तो स्कॉड परत आणल्याशिवाय ही लोक सुधारणार नाही. जोपर्यंत जीवाची भीती नाही तोपर्यंत हे असेच गुन्हे करत राहणार. त्यांच्या मनात भीती नाही. ते कोणत्यातरी नशेत आहेत”, असे निलेश राणे म्हणाले.
राणे म्हणाले, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावर फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करतीलच याची मला खात्री आहे. पण इथून पुढे अशा घटना होऊ नये, यासाठी काहीतरी कडक शिक्षा व्हायला हवी. कारण ही घाण समाजातून गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही.