विशेष प्रतिनधी
पिंपरी : ‘पक्षात गट-तट चालणार नाहीत. कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, रस्त्यावर उतरून संघर्ष करा, असा सल्ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आलेल्या सपकाळ यांनी शनिवारी काँग्रेस भवनात संवाद साधला. ते म्हणाले, ‘गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. संघटनात्मक ताकद वाढवावी. पक्षाचे संघटन बळकट करून बूथ कमिट्या सक्षम कराव्यात. सदस्यनोंदणी करावी. यापूर्वी प्रदेश नेत्यांचे शहराकडे दुर्लक्ष झाले असेल; परंतु यापुढे होणार नाही. मी स्वतः शहराकडे लक्ष देणार आहे.महापालिका निवडणूक कधी होईल हे माहीत नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. स्वबळावर की महाविकास आघाडीसोबत लढायचे, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावे. महापालिकेत काँग्रेसचा प्रतिनिधी असलाच पाहिजे. काही दिवसांत शहरात निरीक्षक पाठवले जातील. ते सर्वांच्या समस्या जाणून घेतील.’
पिंपरी- चिंचवड ही उद्योगनगरी आहे. उद्योजकांच्या समस्या, वाढती महागाई, महापालिकेतील भ्रष्टाचार, सहा वर्षांपासून सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा, शहरात होणारी वाहतूककोंडी या विविध प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, अशी सूचना सपकाळ यांनी केली.