विशेष प्रतिनिधी
मुंबई : चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी करू. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दिले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. खंडणी प्रकरणात केज न्यायालयात हजर केला असताना त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडवर मोक्का अंतगर्त गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, तसंच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होतो आहे त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे.
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार. कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु.मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय.