विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री शेळके याना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. (Sushma Andhare took two crore rupees for candidacy in Buldana )
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या,या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत . सुषमा अंधारे यांनी उमेदवारी देण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले, निलम गोऱ्हे यांच्यावर टिका करण्याचा अधिकार ठाकरेंच्या शिवसेनेला नाही. त्या तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्याकडे ठोस माहिती असते, त्या अनुभवातून बोलतात. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी देवाण, घेवाणीचा आरोप केला आहे. पण बाळासाहेबांनी कधीच असं केलं नाही. सुषमा अंधारे यांनी आमच्या मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून दोन कोटी रुपये घेऊन त्यांना उमेदवारी दिली.
माझ्याकडे व्हिडीओ देखील होता, पण मी तो डिलीट केला. बाहेर पडणारे जे सांगतात ते खोटं नाही. ठाणे आणि सातारा पासिंगच्या दोन मर्सिडीज बेंझ ठाकरेंना मिळाल्या आहेत असा आरोप करून गायकवाड म्हणाले की, संजय राऊत आणि आंदोलक हा विषय फिरवत आहेत, हे बाकीच्यांसोबत घडलं आहे. संजय राऊत यांना घाणेरड्या गोष्टी बोलायची सवय आहे.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा आरोप केला. त्यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी गोऱ्हे यांनी आपल्याकडून उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांच्या अडीचशे कोटी रुपयांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदार संघासाठी जागा वाटपाच्या अंतिम चर्चेपर्यंत आग्रही राहणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली होती. जयश्री शेळकेंच्या ‘हाता’ वर शिवबंधन बांधले होते, यामध्ये सुषमा अंधारे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. आमदार गायकवाड यांनी हाच संदर्भ दिला आहे,