विशेष प्रतिनिधी
पुणे: वारजे माळवाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. रामनगर, म्हाडा कॉलनी, गोकुळनगर यांसारख्या भागांमध्ये टवाळखोर आणि समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. काही गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार असून गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
( Strict steps taken by Warje Malwadi Police to prevent criminals)
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडून सायंकाळच्या वेळी दोन ते तीन अधिकारी आणि पाच ते सहा कर्मचाऱ्यांचे पथक फुट पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आले आहे. त्यामुळे टवाळखोरांना चाप बसणार आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. विनाकारण चौकात बसून महिलांची छेड काढणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकांत मुद्दामहून थांबून ‘व्हिजीलंट पोलिसिंग’ केले जात आहे. तसेच बाजारपेठेतील महिलांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. बाजारपेठा व इतरत्र भेटणाऱ्या महिलांकडे विचारपूस करून कोठे त्रास होत का याबद्दल पोलिसांकडून विचारणा करण्यात येत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि कायदा हातात घेण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे. यामध्ये अभिजीत ऊर्फ चोक्या तुकाराम येळवंडे, ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके आणि ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी यांच्यासारख्या काही कुख्यात गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. वारजे पोलिसांनी केलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्तांनी या आरोपींना स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेतला. तसेच सराईत गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा शेडगे, रोहित वसंत पासलकर आणि आदित्य ऊर्फ बंडी गणेश मंडलीक यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या आरोपींना जामीन मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ओंकार ऊर्फ ढेण्या चौधरीवर हा अल्पवयीन असतानाच त्याच्यावर चार गुन्ह्यांची नोंद आहे. चौधरी १८ वर्षांचा होवूनही त्याने गुन्हेगारी थांबवली नाही. मागील दिड ते दोन महिन्यांमध्येच त्याने दोन गुन्हे केले. त्यामुळे रामनगर परिसरात सुरळीत चालेल्या दैनंदिन जीवनास त्यामुळे बाधा पोचली. त्यामुळे त्याला स्थानबद्ध करण्यात आले. त्याला बुलढाणा येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी यापूर्वीही अनेक गुन्हेगारांना पकडून नागपूर, नाशिक आणि बुलडाणा कारागृहात पाठवले आहे. तसेच यापुढेही ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कोणताही गुन्हेगार कायदा हातात घेईल तर वारजे पोलीसांकडून त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. काही गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी वारजे पोलिसांकडून ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्यात येणार आहे. समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी सांगितले.