विशेष प्रतिनिधी
चिपळूण : शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्ष नेतृत्वालाच सुनावले आहे.
चिपळूण येथे कार्यकर्ता बैठकीत भास्कर जाधव यांनी पक्षातील मरगळीवर थेट निशाणा साधत पक्ष नेतृत्वालाच जाब विचारला. या बैठकीला सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम उपस्थित होते.
शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना दिला. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखा पासून सर्वांच्या नावाने फतवे काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकार्यांच्या कार्य पद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जाधव म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत. अनेक कार्यकर्ते निवडणूक काळात काय करत होते हे पाहायला पाहिजे.
भास्कर जाधव यांनी यापूर्वीही पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. विधानसभा निवडणुकीत कोकण पट्ट्यात मी एकमेव आमदार शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आलो आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शासनदरबारी योग्य तो मान मिळाला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
पक्ष कठीण काळातून जात असताना नेत्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटतेच असे नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्या या भाषणावर देताना राऊत म्हणाले की, भास्कर जाधव आमचे सहकारी आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. पण संघर्षाच्या आणि कठीण काळातून पक्ष जात असताना, अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केले पाहिजे, अशी आमच्या सारख्या नेत्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असे नाही. शिवसेना प्रमुखांनी घेतलेल्या भूमिकांवरही मतभेद झालेले आहेत. तरीही बाळसाहेबांनी हा पक्ष ताकदीने पुढे नेत आहोत.