विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्वारगेट येथील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे. (23 security guards at Swargate bus stand suspended, transport minister orders inquiry of senior officials too)
स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर सराईत गुन्हेगाराकडून अत्याचार करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनराव यांना दिले आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गुरुवारी (27 फेब्रुवारी) एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
स्वारगेट बसस्थानकावर त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी. तसेच त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश दिले आहेत. या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षारक्षकांना तात्काळ बदलण्यात यावे. तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षारक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असेही निर्देश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. संबधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढच्या 7 दिवसात सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.
सध्या ‘महिला सन्मान योजने’ अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानकवर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. .