विशेष प्रतिनिधी
बीड : अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडचं पालक मंत्रिपद घेतलं पाहिजे. कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना सोनवणे म्हणाले, अडीच वर्षांत आधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर अजितदादांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं.
संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अद्याप तीन आरोपी फरारी आहेत. त्यांना पकडण्यात पोलिस दिरंगाई का करतात असा प्रश्न करत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली.तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.
बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. बीडमध्ये काय चाललं आहे हे समजून घ्यायचं असेल तर या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद हे अजित पवारांनी घेतलं पाहिजं. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. मात्र प्रत्यक्षात कारवाई काहीही होत नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून विविध वक्तव्यं येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की आम्ही आरोपींना शिक्षा करु मात्र या प्रकरणाचा तपास पुढे जात नाही. या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय हवा आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे शोधलं पाहिजे. खंडणी प्रकरणात ज्याचं नाव समोर आलं त्यांचा या हत्येशी काही संबंध आहे का हे देखील तपासलं पाहिजे.” अशी मागणी बजरंग सोनावणेंनी यांनी केली.सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात विष्णू चाटेनी आत्मसमर्पण केले. त्यांनी सरेंडर केले की त्यांना अटक झाली याची माहिती पोलिसांनी द्यावी. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड कोण आहे ,त्याला कधी शोधून काढणार? हत्येला १८ दिवस झाले, मग तीन आरोपी अजूनही कसे फरार आहेत असा प्रश्नही सोनवणे यांनी विचारला.