विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधने भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरूच ठेवले आहे. आता आका म्हणजे वाल्मीक कराड काही ठराविक लोकांना महिन्याला पैसे पाठवत होता असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, जो आका आहे, तो आका सोपा आका नाही. आका १७-१७ मोबाईल वापरत होता. त्यामुळे आका काहीही करू शकतो. आका काही ठरावीक लोकांना प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत होता. बीडच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करायची असल्याची माहिती मला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मला वाटतं की ते दिल्लीला जाण्यापूर्वी किंवा आल्यानंतर ते उज्ज्वल निकम यांची भेट घेतील.
“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं आणि न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमधील अंतर्गत असलेल्या विषयांवर बोलणार नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचा कोणावर दबाव वाढला आहे का? की नाही? किंवा कोणावर दबाव नाहीच. याबाबत जो काही विचार करायचा तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावा. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा. माझ्या सारख्या व्यक्तीने राष्ट्रवादीतील अंतर्गत गोष्टींवर काय बोलावं?”, असा सवाल त्यांनी केला.
“संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जर पोलिसांकडून एखादी जरी त्रुटी राहिली तर न्यायालयीन चौकशीत कोणतीही त्रुटी राहू शकत नाही. मग जे कोणी आका, बाका, चाचा, मामा हे या प्रकरणातील सर्व लोक आहेत, ज्यांनी-ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या सर्वांची न्यायालयीन चौकशी होईल आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर माध्यमांशी बोलताना काही आरोप केले होते. वाल्मिक कराडवर मकोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मंजिली कराड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी आपण काहीही बोलणार नसल्याचे सांगितले.