विशेष प्रतिनिधी
मुंबई: उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात बोलताना अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर दगाबाजीचा आरोप केला होता. महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली, असे ते म्हणाले होते.
यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
परळीत जे काही घडलं आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरुच राहिल. काही पोराटोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. ज्यांना मोक्का लावला आहे ते भाडोत्री आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे, त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत नाही का? गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतं आहे की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे. देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ती म्हणजे मोदी आणि शाह. संविधानावर हल्ले होत आहेत. हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.