प्रतिनिधी विशेष
दरे (सातारा) – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट झाली होती. या भेटीनंतर महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज ठाकरे यांनी अचानक पवित्रा बदलत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे खुले आवाहन केले. राज यांच्या या भूमिकेमुळे शिंदे नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ( Talks of UddhavRaj Thackeray coming together Eknath Shinde gets angry tells journalist)
एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही,” आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याची चर्चा रंगली.
या पार्श्वभूमीवर जेव्हा दरे गावात असलेल्या एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे चिडलेली प्रतिक्रिया दिली. “जाऊ द्या यार, काय करता कामाचं बोला,” असे म्हणत त्यांनी पत्रकाराला मागे सरकवत बोलणे टाळले.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची विधानसभा निकालानंतर झालेली भेट केवळ सौजन्यपूर्ण होती, असे शिंदे यांनी नंतर स्पष्ट केले होते. “महायुतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, ही भेट फक्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी होती,” असेही त्यांनी नमूद केले होते.
राज-उद्धव जवळ येण्याच्या चर्चेने शिंदे गटाच्या राजकीय समीकरणात अस्वस्थता निर्माण झाली असून त्यावर शिंदेंची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे.