विशेष प्रतिनिधी
पुणे : गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांकडून डॉक्टर महिलेला पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी अलंकार पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
डॉ. माया श्रीराम तुळपुळे (वय ७२, रा. कर्वेनगर) असे फसवणूक झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तुळपुळे याना सायबर चोरट्याने व्हॉट्सअॅपवर कॉल केला. चोरट्याने तो एमएनजीएलच्या कस्टमर केअर कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार यांनी एमएनजीएलचे बिल भरलेले नसल्याने त्यांचे कनेक्शन कट होणार असल्याची बतावणी केली. तसेच एक एपीके फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने त्यानुसार फाईल डाऊनलोड केली. सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक केला. त्यांच्या बँक खात्यावरून चार लाख ९५ हजार रुपये चोरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ऑनलाईन तोतयागिरी व खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.