विशेष प्रतिनिधी
पुणे: जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नोटा उधळल्या. जिल्हा परिषद मुख्यालयात हा प्रकार घडला. कर्मचाऱ्याने दहा आणि वीस रुपयांच्या नोटा उधळल्या. स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता.
अनिल शिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिरसाट हा मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे. नोटा उधळल्यानंतर शिरसाट हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत एकूण जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र अनिल सिरसाट यांनी सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून भरल्या जाणाऱ्या भरतीत त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) विजयसिंह नलावडे म्हणाले,अनिल सिरसाट यांनी २०२१-२२ च्या नोकर भरतीत अन्याय झाल्याचा आरोप करीत आंदोलन केले. या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नियम डावलून नोकरभरती केली जात नाही. मात्र अपात्र असूनही नियुक्ती मिळावी यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.