विशेष प्रतिनिधी
पुणे: ज्येष्ठ नागरिकाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अटकेची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या तोतया वकील महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी कडू बाबुराव सातपुते (रा. अहिल्यानगर, वय ६३, रा. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून फिर्यादींचा आरोपी स्नेहल कांबळे सोबत परिचय झाला होता. कांबळे हिने फिर्यादींच्या अशिक्षीत आणि आडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वकील असल्याचे खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली. कांबळे हिने सातपुते यांना कोर्टात त्यांच्या सुनेपासून सोडचिठ्ठी घेऊन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी कांबळे हिने फिर्यादींकडून वेळोवेळी रोख आणि बँक खात्यावर पैसे घेऊन सोडचिठ्ठी करून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर कांबळे हिने फिर्यादींना तुमच्या सुनेने तुमच्याविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे खोटे कारण सांगितले. तसेच त्यातून सुटण्यासाठी पोलीस आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला अटक होईल, अशी भीती दाखवून पैशांची मागणी केली.
दरम्यान, याबाबत सातपुते यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची समक्ष भेट घेतली आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एक पथक तयार करून या प्रकारचा तपास सुरू केला. पथकाने लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यात तिच्या कार्यालयात आरोपी महिलेला सातपुते यांच्याकडून १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपीने पैसे मोजून घेताना तसेच आणखी पैशांची मागणी करतानाचे व्हिडिओ शूट देखील पोलिसांनी केले. त्यानंतर पोलिसांनी कांबळे हिला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेच्या घराची झडती घेतली. त्यावेळी तिच्या राहत्या घरी अनेक गुन्ह्यांच्या एफआयआर कॉपी, तक्रार अर्ज, प्रॉपर्टीचे पेपर्स तसेच काही संशयीत कागदपत्रे आढळून आले आहेत. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.