विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी कमी केले आहे. जर पुढील काळात जरांगे यांनी मोर्चे आणि धस यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देऊ,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजलीसाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
हाके म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या राज्यात गुन्हेगारांची जात शोधून त्यांना समाजाला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांकडून होत आहे. जरांगे यांची भाषा सुरेश धस यांनी घेतली आहे. घरात घुसून मारेल हे दहशत निर्माण करणारे वक्तव्य आहे. जरांगे यांचे वजन 35 किलो आणि घुसून मारतो म्हणतो.
अंजली दमानिया यांच्यावर टीका हाके म्हणाले, त्या म्हणाल्या की बीड मध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत. गोरगरीबाची पोरं, ऊस तोड कामगारांची पोर अभ्यास करुन,कष्ट करुन अधिकारी झाले तुम्ही त्यांची जात काढता.
आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण सुरु केले आहे. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत वेगळी भाषा होती आणि निवडून आल्यानंतर वेगळी भाषा होती. निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो, पराभूत झालेल्यांच्या भावना समजू शकतो. धनंजय मुंडे निवडून येऊ नयेत यासाठी प्लानिंग केले गेले. त्यानंतर मंत्री होऊ नये यासाठी प्लॅन केला गेला. सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे की ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीड मध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना जिल्ह्यातील गॅंग्स ऑफ बीड दिसले नाहीत का ? बंदुकी दिसल्या नाही का? धनंजय देशमुख यांनी सांगितले होते की संतोष देशमुख यांची हत्या जातीयवादातून झालेली नाही तरी सुद्धा राज्यात मोर्चे काढले जातात. सोळंके आणि क्षीरसागर यांचे घर जाळले त्यावेळी ओबीसी धावून आले होते, या हत्येला जातीचा रंग दिला जातोय, आरोपीला जात-पात नसते. देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाचा माणूस गृहविभागावर प्रश्न निर्माण करत आहे सुरेश धस प्रभु रामाच्या नावावरील जमिन हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा देखील हडप करतो. आष्टी मधील आदिवासी संजय गायकवाड याच्या हत्येचा शोध लावावा, कुठे गेला तो आदिवासीचा पोरगा ? सुरेश धस यांना सर्व माहिती त्यांना एसआयटीचे प्रमुख बनवा. गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीला थांबून अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री झाले. मराठवाड्याला बदनाम केले जात आहे
हाके म्हणाले , खैरलांजी हत्या झाली त्यावेळी जात बघून मोर्चे काढले नाहीत. तुम्ही आता जातीचे मोर्चे काढता आणि संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय लोकांना टार्गेट करता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी कमी केले आहे. ज्या वाल्मिक कराडचे फोटो धनंजय मुंडे सोबत आहेत, त्यांचे फोटो शरद पवार,जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुरेश धस यांच्यासोबत देखील आहेत. तुम्ही जात बघून अधिकारी बाजूला काढत असाल तर आम्ही जात काढावी का?
शरद पवारांवर टीका करताना हाके म्हणाले, माझे प्रश्न आहेत की पुण्यात दोन दिवसात कोयत्या गँग कडून हत्या होते. आज पुण्यात इंजिनियर तरुणीची हत्या झाली. स्वतःच्या जिल्ह्यात मुळशी पॅटर्न होतो. त्या जिल्ह्यासाठी शरद पवार कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला नाही पत्र लिहिले नाहीशरद पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटायला गेले का?
संतोष देशमुख हत्याप्रकरण असेल किंवा इतर घटना या महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणाऱ्या घटना आहेत