विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीत राहायला कोणी उत्सुक नाही. आमदार, खासदार उत्सुक नाहीत. एकेका पक्षांमध्ये चार चार गट आहेत. त्यामुळे कोणी काही बोललं की लगेच दुसरा त्याला उत्तर देतो.थोडे दिवस थांबा. बघा काय काय होतं ते. यापुढे ही महाविकास आघाडी आपल्याला कुठेही दिसणार नाही, असे सूचक संकेत जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहेत.
ठाकरे गटावर ते म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्या सोबत जो घात केला. आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला. पवारांच्या जवळ जाऊन बसला. त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले होते… बाळासाहेबांचे विचार असे होते का? की काँग्रेस सोबत जाऊन बसा. मी आधीच बोललो होतो की तुमचा पक्ष संपलेला असेल. त्यानुसार आज माझा शब्द तंतोतंत खरा ठरला आहे.
महाजन म्हणाले, राज्यामध्ये आमचे सरकार आहे. केंद्रामध्ये आमचे सरकार आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आमच्याकडे यावे वाटत आहे. पण या बाबतीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. आमचे पक्षाचे नवीन अध्यक्ष होतील. नवीन अध्यक्ष तसेच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार याबाबत ते म्हणाले, भविष्यामध्ये काय काय होईल ते बघा. आता आश्चर्य वाटण्यासारखं काही राहिलेलं नाही. अनेक जण पक्ष सोडतील. महाविकास आघाडीमध्ये जायला आता कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेते सुद्धा वेगळ्या मनस्थितीमध्ये चाललेले आहेत.
उद्धव ठाकरे गट आणि भाजपच्या जवळीकीबाबत ते म्हणाले, पाच वर्षे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार आहेत. मोठे बहुमत आम्हाला मिळालेल आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याला भेटायला सर्वजण येतात. त्याप्रमाणेच मला वाटतं हा विषय घ्यावा.
पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त करताना महाजन म्हणाले, तिन्ही नेते आहेत. मुख्यमंत्री आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. आमचे अध्यक्ष आहेत. हे सर्व नेते याबद्दल रोज चर्चा करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं लवकरच फार काही वेळ लागणार नाही.. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल
धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.याबद्दल आता अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेले आहेत. चौकशीचा अहवाल येईल त्या वेळेला सर्व स्पष्ट होईल.
सर्व महापालिकांची आमचे तयारी आहे. गेल्यावेळी सुद्धा आम्ही सर्व महापालिका एक हाती ताब्यात घेतल्या होत्या. या वेळच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्व आमचे विक्रम मोडू. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे मतदारांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही सर्व महापालिका ताब्यात घेऊ, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.