विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं आहे. या प्रकरणी न्याय मिळण्याकरता त्यांच्या कुटुंबीयातील सर्वच सदस्य रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरते आहे. रयत क्रांती संस्थेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण न्याय निवाडा निश्चित होणार आहे, असे म्हटले आहे.
खोत म्हणाले, बीडमध्ये अमानुष पद्धतीने सरपंचाचा खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मने सुन्न झाली आहेत. देवाच्या काठीला आवाज नसतो. त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण न्याय निवाडा निश्चित होणार आहे. ज्या दिवशी आरोपी पकडले जातील त्यांना या मांडवाखालून जावंच लागेल. ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवावी.
राज्य शांततामय चालवायचं असेल, जनतेला शांततामय व्यवस्था देऊ शकेल तर जनता आपल्यावर विश्वास ठेवेल. सरकारच्या तपासात जे जे येतील, त्यावर कारवाई होईल. तपास आता योग्य दिशेने चालला आहे. सामाजिक क्षेत्रात विविध लोक आणि संघटना काम करत असतात. समाजात गुन्हेगारी वाढू नये म्हणून ते काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. आपल्याला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्रिपद मिळाली नाही म्हणून नाराजीच्या चर्चेवर खोत म्हणाले, मी नाराज नाही, हे सरकार यावं याकरता आम्ही अटोकाट प्रयत्न केले. ५० वर्षांची काँग्रेसची राजवट आम्ही पाहिलीय. त्या काळात गावगड्यांची फसवणूक केली गेली. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्त्व आणि विकासाची कल्पकता असणारं नेतृत्त्व देवाभाऊंच्या रुपाने महाराष्ट्राला लाभला आहे, छातीचा कोट करून आम्ही उभे राहणार आहोत. आम्हाला पदाची अपेक्षा नाही, आम्ही खळं राखणारे शेतकरी आहेत, त्यामुळे आम्ही देवाभाऊंच्या पाठीशी आहोत.