विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. या आजाराच्या रुग्णांना दोन मिनिटंही बोलता येत नाही, अशी माहिती स्वतः धनंजय मुंडेंनी दिली आहे. ( Dhananjay Munde is suffering from Bell’s Palsy, unable to speak for even two minutes)
मुंडे यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…
मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशय घेतला जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी विभागात घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे अडचणीत आले आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीलाही ते असले नव्हते. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला आहे.