विशेष प्रतिनिधी
पुणे : शासनाने दिलेल्या भूखंडाचे प्रस्ताव मान्य करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना अव्वल कारकूनाच्या खासगी हस्तकाला रंगेहात पकडण्यात आले. अव्वल कारकून महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. ( A bribe of four lakhs to the dam victims, a female top clerk and a craftsman were caught red-handed)
शिरूरच्या उपविभागीय कार्यालयात सोमवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
सुजाता मनोहर बडदे असे या अव्वल कारकून महिलेचे नाव आहे. तिचा साथीदार तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा. इंदिरानगर, अप्पर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार यांची टेमघर धरणामध्ये जमीन संपादन झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे शेतजमीन व घरासाठी दोन गुंठे भुखंड दिला गेला आहे.
तक्रारदाराच्या घरातील चार सदस्यांसाठी व त्यांच्या सख्ख्या भावाच्या घरातील सदस्यांसाठी चार असे एकूण आठ जणांचे आठ प्रस्ताव आरोपी लोकसेवक सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते. या घरांचे भुखंड मंजुर होण्यासाठी आठ प्रस्ताव उपविभागीय अधिकारी शिरुर यांच्या समक्ष ठेवून त्यांच्याकडून ते मंजूर करुन देण्यासाठी बडदे हिने तक्रारदाराकडे प्रत्येक प्रस्तावासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये असे आठ प्रस्तावांसाठी एकुण ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. ७ फेब्रुवारी रोजी बडदे हिची उपविभागीय कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी केली असता, तिने प्रस्तावासाठी तडजोडीअंती ४० हजार रुपये असे आठ प्रस्तावासाठी ३ लाख २० हजार रुपयाची मागणी केली. ही लाच रक्कम खाजगी व्यक्ती तानाजी मारणे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. १० फेब्रुवारी रोजी सापळा लावण्यात आला. बडदे हिच्या सांगण्यावरून लाचेचा पहिला हफ्ता म्हणून तक्रारदाराकडून १ लाख ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मारणे याला रंगेहात पकडण्यात आले. बडदे हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.