विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गच्छंती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी हिस्टरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील, विश्वजीत कदम यांची आणि चर्चेत आहेत
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे समजत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 101 जागा लढवून काँग्रेसला केवळ 16 जागा जिंकता आल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दर्शवली आहे.
यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजत आहे. काँग्रेस हायकमांडकडून बोलावणे आल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण तातडीने दिल्लीला रवाना झाले.
नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. पण पक्षातील तरुण चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी द्यावी, अशी भूमिका चव्हाणांनी घेतली आहे. यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं, असे काँग्रेस हायकमांडला सुचवले आहे.
पुढील दोन ते तीन दिवसात काँग्रेसची दिल्लीत याबाबतची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? हे ठरणार आहे.