विशेष प्रतिनिधी
पुणे : परदेशात राहणाऱ्या एकाच्या बंगल्यातील पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतून १४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली. ( The thief who stole the jewels buried in the safe under the bed was arrested)
संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेसजवळ, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीची विट असा नऊ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कल्याणी याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.
तक्रारदार हे कुवेत मधल्या एका तेल कंपनीच्या वित्त विभागात कामाला आहे. त्यांनी लोणी काळभोरच्या तरडे परिसरात चार गुंठे जागा खरेदी करून बंगला बांधला आहे. वर्षातून तीन ते चार वेळा सुटी घेऊन ते बंगल्यात वास्तव्यास येतात. सुरक्षेसाठी त्यांनी बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
शयनगृहातील पलंगाखाली त्यांनी तिजोरी तयार करून तिच्यावर फरशी बसवली होती. या तिजोरीत सोन्याचे दागिने आणि चांदीची वीट ठेवली होती. १ फेब्रुवारी रोजी ते कुवेतहून परतले असता, बंगल्याचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच तिजोरीतील ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान, ३१ जानेवारी रोजी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले. पुढील तपासात सराईत चोरटा संगतसिंग कल्याणी आणि त्याच्या साथीदाराने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या कल्याणीला अटक केली. चौकशीत त्याच्यावर घरफोडीचे एकूण नऊ गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. तसेच संगतसिंगचा साथीदार पसार झाला आहे. त्याला बंगल्यातील तिजोरीची माहिती होती. त्याला अटक केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस कर्मचारी गणेश सातपुते, संभाजी देवीकर, विलास शिंदे, सुनील नागलोत, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रदीप गाडे, चक्रधर शिरगोरे यांनी ही कामगिरी केली.