विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 26/ 11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला लवकरात लवकर फाशी देऊन पाकिस्तानचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध तत्कालिन काँग्रेस सरकारला उघड होऊ द्यायचा नव्हता, असा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ आणि नूतन खासदार उज्वल निकम यांनी केला. ( The then Congress government did not want to expose Pakistan’s links with terrorists, alleges Ujjwal Nikam regarding the 26/11 attacks)
जम्मू काश्मीरमध्ये झालेला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर अशा मुद्द्यावर राज्यसभेत चर्चेत राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी सभागृहात पहिलेच भाषण केले.
निकम म्हणाले, तत्कालिन काँग्रेस सरकारला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी देण्याची घाई होती. मात्र या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे जगासमोर स्पष्टपणे आणण्यासाठी चौकशीची गरज होती, हे मी सरकारला स्पष्टपणे सांगितले. सरकारने कसाबविरोधात वेगवेगळे चार्जशीट दाखल करायला सांगितले होते. मात्र सरकारच्या मुद्द्याचे खंडन करून मुंबई पोलिसांना एकच चार्जशीट दाखल करण्याचे सुचविले. त्यानंतर खटला निकाली काढून दहशतवादामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे जगासमोर आणले.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. इतर दहशतलवादी मारले गेले. त्याचवेळी अजमल कसाब हा मुंबई पोलिसांच्या जिवंत हाताला लागला. त्यावेळी मला सांगितलं गेले की कसाबविरोधात वेगवेगळे चार्जशीट दाखल करा, जेणेकरून लवकरात लवकर त्याला फाशी होईल. त्यावर मी तत्कालिन सरकारला असे सांगितले की आपण जर असे केले तर पाकिस्तानचा बुरखा आपण कधीच फाडू शकत नाही. आम्ही सरकारचे ऐकले नाही. मुंबई पोलिसांना सांगितले की कसाबविरोधात एकच चार्जशीट दाखल करा. एका वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण केली. इस्लामाबादला जाऊन आम्ही पाकिस्तानशी चर्चा केली. कट आपण रचला, पुरावे आम्हाला कसले मागता, असे आम्ही ठणकावले. पुरावे गोळा केले आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा जगासमोर फाडला, असे उज्ज्वल निकम म्हणाले.