विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Law and order rags in Pune, girl raped in Shivshahi bus at Swargate station)
पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.स्वारगेट एस टी स्टँड आवारात ही घटना घडली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.फलटणला गावी जाणाऱ्या तरुणीला शिवशाही बस फलटणला जाते, असे सांगून बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बलात्कार करण्यात आला .
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एक २६ वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले.त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. ही तरुणी बसमध्ये गेली. तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात आरोपी निष्पन्न झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.