विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, असा इशाराही दिला आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल पवार म्हणाले, “कुठंतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय असं माझं मत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांनी तसं सांगितल्यानंतर आम्ही इतर चांगल्या अधिकाऱ्यांची तिथं नेमणूक करू. महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीबद्दल मोठी चर्चा होत आहे आणि हे आपण सर्वजण पाहत आहोत.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून काळात खून, दरोडे, खंडणी, हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्या या शहरात सक्रीय आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून अजित पवारांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले,पुण्यात गुन्हेगारी वाढली असं म्हणणं चुकीचं ठरेल. पुण्याचा व्याप आणि विस्तार पाहिला तर पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतेय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. अर्थात एक जरी गुन्हेगारी घटना घडली तरी ती गांभीर्यानेच घेतली पाहिजे. अशा घटना घडत आहेत आणि त्यावर आमचं लक्ष आहे. पोलीस अशा सर्व घटनांमध्ये तात्काळ आरोपींना पकडत आहेत. त्यांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या सुरक्षिततेला गांभीर्याने घेत शहरातील सीसीटीव्ही नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आमच्या सरकारने हाती घेतलं आहे.