विशेष प्रतिनिधी
पुणे : पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या देत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर हल्ला चढविला. ( Chief Minister Devendra Fadnavis’ attack on hypocritical progressivism that abuses culture in the name of progressivism)
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मध्यप्रदेशचे लोकनिर्माण मंत्री राकेश सिंह, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, स्नेहल प्रकाशनाचे रविंद्र घाटपांडे आदि उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “भारतीय समाजाचे आत्मभान नष्ट करण्यासाठी आक्रमकांनी आपली ज्ञानकेंद्रे आणि प्रतिके जमिनदोस्त केली. गेली ७०० ते ८०० वर्ष त्यांच्या ज्ञानाचा पगडा आपल्यावर बसावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. त्यातूनच आपल्या काही पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकविला गेला. म्हणून आता खरा इतिहास, परंपरा, ज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.
ज्ञान हीच खरी भारताची संस्कृती आहे. म्हणूनच आक्रमकांनी इथली ज्ञानकेंद्रे जमिनदोस्त केली होती. आज आपल्याला पुढच्या पिढीला काही द्यायचे असेल तर केवळ इतिहासाचे गोडवे गाऊन चलाणार नाही, तर त्यावर संशोधन करत पुढील पिढ्यांना काही देणे गरजेचे आहे.
भारतीय संस्कृती ही सनातन अर्थात नित्य नूतन असल्याचे मत डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी मांडले. ते म्हणाले, समाज जसा बदलत गेला तशा आपल्या संस्कृतीतील स्मृती बदलत गेल्या. मात्र आज या संस्कृतीची समृद्धी आपण विसरलो आहोत. ब्रिटीशांनी तर आपले ज्ञान संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर तरी आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपली संस्कृती येईल, असे वाटले होते. पण पहिल्या दोन शिक्षणमंत्र्यांना आपल्या संस्कृतीचे सोयर नव्हे तर सुतकच होते. आता मात्र तो अभ्यूदय होईल याची मला खात्री आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गुलामगिरीची मानसिकता संपविणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेची माहिती आणि जाणीव करुन देण्याची गरज आहे.
भारताचे मूळ जाणून घेऊन त्याची वैज्ञानिक आणि तथ्यात्मक माहिती मांडणे गरजेचे आहे, असे मत राकेश सिंह यांनी यावेळी मांडले. तर भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम होणे. निश्चितच अभिमानास्पद आहे, असे मत राजेश पांडे यांनी मांडले.
लेखक म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रशांत पोळ म्हणाले, “भारतीय ज्ञान परंपरा ही केवळ भूतकाळात जगण्याची गोष्ट नाही. तर त्यांची आज सुद्धा गरज आणि उपयोगिता आहे. त्यासाठी या ज्ञान परंपरेवर संशोधने व्हावीत आणि भारतीय शास्त्रज्ञांना आणि ऋषींना त्याचे क्रेडीट मिळायला हवे.” रविंद्र घाटपांडे यांनी आभार मानले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.