पुणे: पुणे शहर पोलिसांनी सी.ई.आय.आर. पोर्टलच्या मदतीने हरविलेले किंवा गहाळ झालेले ४५६ मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले. (Police found 456 lost mobile phones and returned them to citizens)
पुणे शहर पोलिसांनी नागरिकांसाठी त्यांच्या हरवलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ‘लॉस्ट अँड फाउंड’ पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलद्वारे हरवलेल्या फोनच्या तक्रारी नोंदवता येतात. तसेच ‘प्रॉपर्टी मिसिंग’चा ऑनलाईन दाखला देखील नागरिकांना मिळतो. नागरिकांना त्यांचा आधारकार्डसह सी.ई.आय.आर. केंद्रीय पोर्टलवर तक्रार नोंदवावी लागते. त्यानंतर सी.ई.आय.आर. पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार हरवलेल्या मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक ट्रॅक करून, तांत्रिक विश्लेषण करून हरवलेल्या मोबाइल फोनमध्ये सध्या सुरू असलेल्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतला जातो. ही माहिती सी.ई.आय.आर. पोर्टलवरून पोलिसांना मिळते.
शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा, संगणक शाखा आणि सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांची सहा संयुक्त पथके तयार करण्यात आली. सी.ई.आय.आर. पोर्टलवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलच्या शोधासाठी तांत्रिक विश्लेषण केले. गेल्या एका महिन्याच्या कारवाईत, एकूण २३०० तक्रारींपैकी ४५६ हरवलेले मोबाईल शोधण्यात आले. पुणे शहराबाहेर ट्रेस झालेले मोबाईल शोधण्याचे काम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांच्या हस्ते मोबाईल परत वितरण
१४ फेब्रुवारी रोजी पुणे पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉल येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
ही कारवाई सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, टीम १ चे राहूल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, टीम २ चे प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, टीम ३ चे चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, टीम ४ चे राजेंद्र पुनेकर, लटू सुर्यवंशी, समीर पिनाणे, टीम ५ चे इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वरी चुटके, टीम ६ चे किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर तसेच सुषमा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.