पुणे: सिंहगड रस्त्यावरील पोळेकरवाडी येथील बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर (70) यांच्या निघृण खूनप्रकरणी गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का), 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी हा खडकवासला, डोणजे, गोन्हे बुद्रुक आणि संपूर्ण सिंहगड रोड परिसरावर वर्चस्व मिळवण्यासाठी संघटित गुन्हेगारी कारवाया करत होते.
या गुन्ह्यात मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे (32) आणि त्याचे साथीदार रोहित उर्फ बाळा किसन भामे (22), मिलींद देविदास थोरात (24), शुभम पोपट सोनवणे (24) आणि रामदास दामोदर पोळेकर (32) यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक संघटित गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
पोळेकर यांच्या हत्येनंतर हवेली पोलिसांनी सखोल तपास करून या टोळीचे गुन्हेगारी नेटवर्क उघडकीस आणले. त्यांच्या वाढत्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला.
सखोल तपासानंतर कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी योगेश भामे आणि त्याच्या टोळीविरोधात मोक्का कलम 3(1)(i)(ii), 3(2), 3(4), आणि 4 अंतर्गत कारवाईला मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे त्यांच्या संघटित गुन्हेगारी जाळ्यावर आळा बसणार असून परिसरातील बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे.