विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. आता पुन्हा एकदा सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीच्या दिशेने जात होते. यावेळी शनिवारी (दि. ११ जानेवारी) रात्री साडे आठच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल.
या घटनेवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा अपघात की घातपात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही अवैध राखेची वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.
परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.