मुंबई : यंदा तरी प्रामाणिकपणाला फळ मिळेल म्हणून विधान परिषदेच्या उमेदवारीची अपेक्षा असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा निराश व्हावे लागले आहे. बाजूने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.
भाजपाच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत. विधानपरिषदेत भाजपाच्या वाट्याला तीन जागा आहेत.
भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर येण्याच्या आधीपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणारे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रामाणिकपणाला फळ मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली. यामध्ये एक नाव माधव भंडारी यांचे होते. आतापर्यंत अनेक वेळा त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांना हुलकावणीच मिळाली. गेल्या वर्षी राज्यसभेच्या महाराष्ट्रातून तीन जागा निवडून गेल्या होत्या. त्यावेळी भाजपने अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. यावेळीही भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी एक ट्वीट केले होते . त्यांना म्हटले होते की, १२ वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही. १२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग…. या भावनिक पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. माधव भंडारी आमचे नेते आहेत तर त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल असे ते म्हणाले होते. त्याप्रमाणे यावेळी त्यांचा विचार होण्याची शक्यता होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्ती आणि मानद सचिव संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. सध्या मुख्यमंत्र्यांचे मानद सचिव म्हणून फडणवीस यांनी नागपूरची जबाबदारी दिली आहे.
दुसरे नाव दादाराव केचे आहे. आर्वी मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले केचे यांचे तिकीट कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी केचे यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. त्यांनाही विधान परिषदेवर संधी मिळाली आहे.