मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलोय, हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
सांगली : बटेंगे तो कटेंगे या नाऱ्या भोवती सर्व हिंदू विधानसभेमध्ये एकत्र झाले. आम्ही जरी दलित असलो तरी हिंदू आहे. त्यामुळे आम्ही मागे नाही. मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तान मधून आम्ही चार वेळा चौकार मारला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी केले.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री आणि नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्यात माजी मंत्री आणि मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभेचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. मिरज मतदारसंघ हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असून येथे मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
खाडे म्हणाले, जे ह्रदयात आहे, त्याला जागृत करण्यासाठी, चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. निसटता पराभव आपल्या पदरी पडला, काही मतं कमी पडली. पण, विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर सगळा हिंदू एकत्र झाला आणि विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला. आज सभागृहात एवढीच गल्ली त्यांच्यासाठी राहिलीय, बाकी सगळं सभागृह आपलं आहे. आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्हीपण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे.