विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील तरूणाला केली मारहाण मारणे टोळीला महागात पडली आहे. यावरून मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलेच खडसावल्यावर मारणे टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं? माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशारा पुणे पोलिसांना दिला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामधील अटक केलेल्या तीन आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यासोबतच मारणे टोळीला मोका लावला असून टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण 27 आरोपी रडावर असून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीतील गुंडांची माहिती मागवून घेतली आहे.
देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात सुरवातीला झालेल्या तपासाच्या सुरूवातीच्या काळातील कारवाईच्या बाबतीत मी नाराज होतो. आता गुन्हेगारांनी छोटीशी चूक जरी केली तर सोडलं जाणार नाही. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर करून त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कडून मागवली आहे. काही गुन्हेगार पुण्याबाहेर जाऊन गुन्हे करत आहेत. त्यांच्यावर देखील आमच लक्ष असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाली होती. त्यामुळे कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे ही आरोपी आहे.