विशेष प्रतिनिधी
पुणे : मुलीशी बोलतो म्हणून बाप आणि दोन भावांकडून अल्पवयीन युवकाचा निर्घुण खून करण्यात आला. वाघोलीतील वाघेश्वरनगर भागात मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
मुलीचे वडील आणि दोन भावांनी मिळून १७ वर्षीय अल्पवयीन युवकाचा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून खून केला. तिनही आरोपींना वाघोली पोलिसांनी अटक केली असून सहा जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. गणेश वाघु धांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तो लक्ष्मण पेटकर यांच्या मुलीसोबत तो वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि मुलगी नियमितपणे बोलत असत. मात्र लक्ष्मण पेटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. या रागातूनच त्यांनी या खुनाचा कट रचला. मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गोरे वस्ती वाघेश्वरनगर परिसरात हि घटना घडली. गणेश हा नेहमीप्रमाणे मित्रासोबत फिरत असताना, लक्ष्मण पेटकर (६०), नितीन पेटकर (३१) आणि सुधीर पेटकर (३२) यांनी त्याला गाठले. या तिघांनी मिळून गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. मारहाणीत गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे पुढील तपास करीत आहेत.