विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी अशीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे वक्तव्य केले आहे. १५ दिवसांपूर्वी सैफ अली खानचं कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यानंतर आता हा हल्ला झाला, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत म्हणाले, सैफअली खान वरती चाकू हल्ला झाला. पंतप्रधान मुंबईत आहेत . त्याच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे. पंतप्रधान जरी मुंबईत असले तरी या राज्यांमध्ये काय चालले आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केले तर त्यांना यातना होतात. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर घरात झोपड्यांमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसत आहेत. जे मोठे कलाकार आहेत त्यांना घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तिथे सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. सैफअली खानवर हल्ला होतो हा नरेंद्र मोदी यांना हा खरं म्हणजे धक्का आहे. पंधरा दिवसांपूर्वी सैफअली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता सैफअली खान वरती हल्ला झाला कोणी केला चोराने की कोणी ?
या राज्यात कोणीही सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे असा आरोप करत राऊत म्हणाले, हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावरती आहे. सरकार सभा, संमेलन, उत्सव ,प्रधानमंत्री यांचं आगत स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे.त्याच्यामुळे बीड पासून मुंबई पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही . या राज्याची 90% पोलीस सुरक्षा जे काय फुटलेली लोक आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत. कोणी जरी आमचा साधा उप शाखाप्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन पोलिस दिले जातात. जिल्हाप्रमुख फोडला तर पाच दिले जातात . सामान्य माणसांना कोणतीही सुरक्षा नाही पण भ्रष्टाचारी बिल्डर यांना पूर्ण सुरक्षा आहे. सैफअली खानला देखील भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आला आहे. परंतु पद्मश्री पुरस्कार असलेल्या व्यक्तीला देखील मुंबईत सुरक्षित राहता येत नाही .
नागपूर महिला अत्याचारवर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी हे बघितलं पाहिजे अशा प्रकारच्या घटना या वाढत चाललेल्या आहेत. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचा गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे काय एकाच दिवसात झालेल्या नाही आहे
वाल्मीक कराड हा तपासाचा विषय आहे. आमच्या विषयाप्रमाणे याच्यावरती पडदा पडलेला आहे, असे राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांचे भाषण काळजीपूर्वक पहा. माझ्या माहितीप्रमाणे ही गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय मेळावा संरक्षण जागेत झाला. इंडियन नेव्ही च्या एका सभागृहात पक्षाचा किंवा त्यांच्या आमदार खासदारांचा मेळावा झाला असेल तरी संधी इतर पक्षांना मिळणार आहे का ? या मेळाव्याचे पैसे कोणी भरले? असा सवाल करत राऊत म्हणाले, आम्हालाही कुलाबामधील नेव्ही नगर मधील त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आहे. आम्हालाही संधी मिळणार आहे का? जर तुम्ही भारतीय पक्षाला आणि त्यांच्या लोकांना संधी देत असाल तर आम्हालाही मिळाली पाहिजे देश सगळ्यांचा आहे.
प्रधानमंत्री यांनी काय सांगितलं एकमेकांना द्वेष भावना देऊ नका, म्हणजे काय द्वेष भावनेचे सर्वात मोठे कोठारे तुम्ही आहात
ते आपल्या आमदारांना म्हणाले आहेत की प्रतिमा जपा,. ज्या पार्टीत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आहेत अजित पवार आहेत प्रफुल पटेल आहेत यांच्यावरती प्रधानमंत्री भ्रष्टाचारांचे आरोप केले आहेत. हे सगळे लोक ज्या मंचावर उभे आहेत पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा हा किती मोठा विनोद आहे. आपण दोन वर्षांपूर्वी ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते तुमच्या बाजूला बसले आहेत आणि तुम्ही संदेश देत आहे व्यासपीठावरून प्रतिमेला जपा. कोणाची प्रतिमा आपण या देशाच्या राजकारणाची प्रतिमा मलीन केली आहे त्याच्यावर बोला असेही राऊत म्हणाले.