विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करतील. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात.
राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान सप्टेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त असून, नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या निवडीची प्रक्रिया सरकारने राबविली.
दरम्यान, आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक आहेत.