In Lok Sabha Elections: Percentage of women voters is higher than men
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महिला मतदारांचा मतदानातील सहभाग वाढला असून पुरुषांपेक्षा मतदानाची टक्केवारी ही वाढली आहे. 2024 मध्ये महिलांचे मतदान 65.78% इतके होते, जे 2019 च्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या (65.55%) पेक्षा जास्त राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सविस्तर आणि तपशीलवार आकडेवारी निवडणूक आयोगाने (ECI) प्रकाशित केली आहे. या आकडेवारीत महिलांच्या मतदारसंख्या आणि सहभागाबाबत महत्त्वाचे निरीक्षण समोर आले आहे.
2024 मध्ये नोंदणीकृत महिला मतदारांची संख्या 47,63,11,240 इतकी आहे, जी 2019 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे (43,85,37,911). यामुळे एकूण मतदारसंख्येत महिलांचा वाटा 48.62% झाला असून, 2019 च्या 48.09% च्या तुलनेत ही लक्षणीय प्रगती आहे.
2024 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे महिलांची संख्या 946 झाली, जी 2019 मध्ये 926 होती.
सर्वाधिक महिला मतदारांचा टक्का पुडुचेरी (53.03%) येथे आहे, तर केरळ (51.56%) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
धुबरी (आसाम) येथे सर्वाधिक महिला मतदान (92.17%) झाले, तर त्यानंतर तामलूक (पश्चिम बंगाल) येथे 87.57% महिला मतदारांनी हक्क बजावला.
2024 मध्ये महिला उमेदवारांची संख्या 800 वर पोहोचली आहे, जी 2019 मधील 726 होती.
महाराष्ट्र (111 महिला उमेदवार), उत्तर प्रदेश (80) आणि तमिळनाडू (77) यांनी सर्वाधिक महिला उमेदवार दिल्या.मात्र, अद्याप 152 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नाही, हे चिंतेचे आहे.
महिला मतदारांची ऐतिहासिक कामगिरी
2019 नंतर सलग दुसऱ्यांदा महिलांनी मतदानाच्या प्रमाणात पुरुषांना मागे टाकले आहे. यामुळे भारतीय लोकशाहीत महिलांचा सहभाग आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे.
महिला शक्तीचा विजय साजरा करणाऱ्या या निवडणुकीने देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवा अध्याय निर्माण केला आहे.