पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. ( In Vanraj Andekar murder case 1700-page charge sheet filed against 21 accused , including sister and brother-in-law)
शुक्रवारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त, तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांच्यामार्फत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध बाल न्याय मंडळात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. टोळीयुद्ध आणि मालमत्तेच्या वादातून १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ येथे आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात गुंड सोमनाथ गायकवाड, आंदेकर यांची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश कोमकर आणि इतर २१ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपींनी एकत्र येऊन खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. तसेच खून प्रकरणातील आरोपी अभिषेक खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे खूनासाठी पिस्तुले व काडतुसे मध्य प्रदेशातून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. पसार आरोपींना रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपपत्रात एकूण ३९ साक्षीदारांचे जबाब, खून प्रकरणात आरोपींचे संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे. आंदेकर खून प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल करण्यास तीन वेळा मुदतवाढ मागितली होती. तसेच पोलिसांनी आरोपींकडून आठ पिस्तुले, सात काडतुसे, सात कोयते, तीन मोटारी आणि सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
काय आहे खुनामागील कारण?
वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी हिचे नाना पेठ येथे दुकान होते. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हे दुकान हटवले गेले. ही कारवाई आंदेकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप संजीवनीने केला होता. याच कारणातून तिच्या पतीसह इतर आरोपींनी कट रचून आंदेकर यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच २०२३ मध्ये नाना पेठ परिसरात सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखील आखाडे याचा आंदेकर टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने आंदेकर यांच्या हत्येची योजना आखल्याचे समोर आले आहे.