विशेष प्रतिनिधी
जालना : सिल्लोड विधानसभा मतदारसंघात केवळ 2440 मतांनी विजय मिळाल्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मनाला चांगलेच लागले आहे. लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद पाहिजे अशी खंत व्यक्त करत अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांचा पराभव करत अब्दुल सत्तार विजयी झाले. पण त्यांचे विजयाचे अंतर खूप कमी होते. त्यामुळेच सत्तार म्हणाले, .पाच वर्षे काम केली तरी मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते. हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं. सिल्लोडची आगामी नगरपरिषदेची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असं सत्तार यांनी म्हटलं.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्तार म्हणाले, यावेळी आम्ही काठावर निवडून आलो. पण सध्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे, ते भविष्यासाठी घातक ठरत आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल. विधानसभेच्या निवडणुकीत मी उभे राहणार नाही. त्यामुळे कुणी काही माझं वाकडं करू शकत नाही. माझ्या मुलांला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ. मी लढणार नाही. मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होते.”
मी सिल्लोडची विधानसभा लढणार नाही. मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद पाहिजे. जातीवादामध्ये माणूसकीही सोडून द्यावी लागते असंही सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार म्हणाले की, “पाच वर्षे सातत्याने 18 तास काम करायचं. पण विधानसभा मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद, धर्मावर प्रचार सुरू होतो. जात धर्मावर निवडून आलेले लोक हे मरणाऱ्यांना कफनही देणार नाहीत. ते कोणताही निधी आणणार नाहीत. लोकांना लागलेली ही सवय बदलावी लागणार आहे. नाहीतर राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही, कुणीही कुणाला मदत करणार नाही.