विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : राज्यातील उध्दव ठाकरे यांच्यापासून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. त्यात आता माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचीही भर पडली आहे. तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असे विधान वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125 वी जयंती चंद्रपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, खरे तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पहायचो आणि ते नंतर मुख्यमंत्री देखील झाले. आता तुमच्याकडे कर्तुत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिंमत आहे. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे. स्वाभाविक आहे. त्यात काही वेगळे नाही.
खरे तर तुम्ही बाजूची खुर्ची घेण्यात फार पटाईत आहात. राजकारणात हे कौशल्य, काही गोष्टी जूनियरकडून सीनियरला शिकावे लागते. ते मी किशोर जोरगेवार यांच्याकडून येथे आल्यापासून शिकलो, असा टोल विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मला माहीत आहे की चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि ‘वारां’चा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात.