विशेष प्रतिनिधी
मुंबई : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं. यावेळी शिक्षण विभागाला सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले, संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा.शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी.
समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश देत मुख्यमंत्री म्हणाले, सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करावीविद्यार्थ्यांचे आधार लिंक लवकर पूर्ण करावे तसेच शाळांच्या विकासासाठी समग्र शिक्षाच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.