विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्या जर मला मरण आले तरी खंत नाही हे वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांना चांगलेच भोवले आहे. मनसेच्या राज्यव्यापी शिबिराचे निमंत्रणच त्यांना दिले गेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महाजन यांनी मी जिवंत का? अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( Prakash Mahajan’s anxious question, ” Why I Am alive?”, as he was not called to the camp.)
कारण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे मनसेचे सध्या तीन दिवसीय राज्यव्यापी शिबिर पार पडत आहे. मात्र या शिबिरचं प्रकाश महाजन यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर वरळी डोम येथे ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले होते. या Friendship मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्या जर मला मरण आले तरी खंत नाही असे म्हटले होते.
माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की, पक्ष आम्हाला राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल, तर आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचं? घरातच आमची इज्जत राहत नसेल, तर काय करायचं? पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्त्याला बोलावलं जात नाही. कारण प्रवक्ता त्या निष्कर्षात बसत नाही. पण मी विचारतोय, यात निष्कर्ष कुठून आला? इतरवेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो. लोकांची नाराजी अंगावर घेतो आणि तुम्ही त्याला बोलवत नाहीत. प्रवक्त्याने काय करायला पाहिजे? मला सांगा मी घरच्यांना काय तोंड दाखवू? माझ्या पक्षात आज दिवाळी आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
प्रकाश महाजन म्हणाले की, नारायण राणेंच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही. ही गोष्ट विसरून मी कामाला लागलो आहे. पण आता माझं काय चुकलं? ठीक आहे, मी चुकलो असेन. त्यासाठी तुम्ही माझे कान धरू शकतात. पण दोन भावांनी एकत्र आल्याने माझा काय फायदा होणार होता? एकत्र आले नसते तरी माझं काय नुकसान होणार होतं? जनभावना होती आणि मी जनतेत फिरतो. त्यामुळे मी जनभावना मांडली होती. असे करून मी काय वाईट केलं होतं? पक्षात सुद्धा दोन मतप्रवाह होते. मात्र सर्वांना माफी आणि मलाच फाशी का? पक्षाचे 8 प्रवक्ते आणि सात जणांकडे विविध पदे आहेत, त्यामुळे ते तिथे आहेत. मग केवळ माझ्यासाठीच वेगळा नियम का? कशामुळे असं वागताय? आम्हाला तुम्हीच किंमत देणार नसाल, तर बाकीचे काय किंमत देणार? असा प्रश्न महाजन यांनी विचारला.
राज ठाकरे यांना उद्देशून बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मी देव बदलणार नाही, पण देवाने बोलवल्याशिवाय जाणार नाही. माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल. मला मान नाही, त्यामुळे मी आता पक्षाचा प्रवक्ता नाही. राणेंना अंगावर घेतलं, त्याचं हे फळ मिळत आहे. त्यामुळे मी आता घरी बसणार आहे. कारण मला यातना होत आहेत. चार दिवस झोपलो नाही. राणे यांना भिडलो, तेव्हा कुणीच पक्षाचं सोबत नव्हतं. पण मला आता असं वाटतंय की, मी जिवंत का राहिलो? माझ्या नातीने मला विचारलं की, आजोबा तुम्ही इथे कसे? तुम्ही शिबिरात नाही गेलात? तिला मी काय सांगू? प्रवक्ता हे तुच्छ पद आहे? एवढं माणूस तळमळीने वागतो, तर तुम्ही त्याला सन्मान देऊ शकत नाही का? त्यामुळे आता ठरवलंय की, जिथे सन्मान नाही, तिथे उपाशी राहू शकतो, पण अपमान सहन करू शकत नाही, अशी खंत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली.