विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन बोलत असतात. राऊत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी बांधील नाही.ते रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगपूर मेडिकल कॅालेज आणि आणि आयजेएमसी यांना भेट दिली यावेळी ते म्हणाले, ही दोन्ही जुनी कॅालेज आहेत. दोन्ही इमारतीला अनेक दशक झाले आहे. त्यामुळे इमारती अध्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेतला आहे. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, गती वाढवण्याची आवश्यकता आहे, एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटली आहे. यावर विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांची आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नितेश राणे यांनी ईव्हीएम म्हणजे व्होट अगेन्स्ट मुल्ला असे वक्तव्य केले आहे. यावर फडणवीस म्हणाले, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.