विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यांना आर्थिक मदत करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह विशेष तपास पथकाने नांदेड येथून अटक केली आहे.
बीड पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला अटक केली. त्यानंतर एसआयटीने नांदेड येथून सुदर्शन घुले याला मदत करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह अटक केली आहे.
संभाजी वायबसे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. तो ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो.
वायबसे याने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी सुदर्शन घुलेशी संपर्क साधला होता. आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती. त्यासाठीत्यानेच पैसे पुरवल्याचा आरोप आहे.
बीड पोलिसांनी वायबसे दाम्पत्याला शुक्रवारी रात्री उशिरा नांदेड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच त्यांच्या चौकशीला सुरुवात केली. त्यातून सुदर्शन घुले व सुधीर सांगळेच्या पुण्यातील वास्तव्याची माहिती मिळाली.
संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीने शनिवारी पहाटे सुदर्शन घुले व त्याचा सहकारी सुधीर सांगळे याला अटक केली आहे. या दोघांना सध्या पुण्याहून बीडला आणले जात आहे.
सुदर्शन घुले व सुधीर सांगळेसह पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणे नामक अन्य एका संशयिताला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी सिद्धार्थ सोनवणे बीडमध्ये होता. त्यानंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती मारेकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे.