विशेष प्रतिनिधी
पुणे : ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) आणि इतर डॉक्टरांना फोन करून रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. ( Security guard spreads rumour of bomb planted in Sassoon Hospital arrested by Bundgarden police)
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या सहाय्याने तपास करत आरोपी अरविंद कृष्णा कोकणी (वय २९, रा. नागपूर चाळ, येरवडा) याला शोधून काढले. प्राथमिक चौकशीत त्याने मान्य केले की त्याने रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७३ मधील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्यावरून डॉ. हरिष टाटीया यांना धमकीचा मेसेज पाठवला होता. यानंतर त्याने मोबाईल बंद ठेवून दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू करून वैद्यकीय अधीक्षक जाधव यांना देखील धमकीचा मेसेज पाठवला होता.
याबाबत माहिती अशी की, १२ मे रोजी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून बॉम्बसदृश धमकीचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली. या धोकादायक घटनेनंतर बंडगार्डन पोलिस स्टेशन, बीडीडीएस पथक व पोलीस अधिकारी पो.नि. येळे यांनी तत्काळ ससून परिसराची झडती घेत तपास सुरू केला. या धमकीमुळे रुग्णालय प्रशासन, रुग्ण, नातेवाईक आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
फिर्यादी डॉ. हरिष सुरेश टाटीया यांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपआयुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. अरविंद कृष्णा कोकणी याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर १४ मे रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोउनि स्वप्नील लोहार, पो.अं. प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, मनोज भोकरे, मनिष संकपाळ, महेश जाधव, विष्णु सरवदे, अमित सस्ते, रामदास घावटे, तुषार आल्हाट यांनी ही कामगिरी केली.