विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकत्याच घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तिघांना ८३ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अनुक्रमे कोथरूड, वानवडी आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Cyber thieves cheated three people of 83 lakhs)
कोथरूड पोलीस ठाण्यात तळेगाव येथील कान्हे फाटा येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिंद्रा कंपनीत नोकरी करतात. ते फेसबुक आणि सोशल मिडिया पहात असताना त्यांना आरोपींनी एका टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यांना विविध टास्क आणि यूट्यूब चॅनलला लाईक करण्याचे काम देण्यात आले. हे काम केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला भुललेल्या फिर्यादीने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यास सुरुवात केली. त्यांना वेगवेगळ्या कारणे देत मोबदला देण्यास टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी त्यांच्याकडून २९ लाख ६३ हजार ७६६ रुपयांची रक्कम उकळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तर, वानवडी पोलीस ठाण्यात ६७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेचा व्यवसाय आहे. ही महिला वानवडी येथील ऑक्सफर्ड ब्लूस सोसायटीत राहण्यास आहे. या महिलेला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून २८ लाख २० हजारांची रक्कम उकळली. या महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखविले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एका बँक खात्यात पैसे भरले. सुरुवातीला तिला परतावा देण्यात आला. त्यामुळे विश्वास बसल्याने त्यांनी आणखी रक्कम गुंतविली. मागील तीन महिन्यात वेळोवेळी २८ लाख २० हजार रुपये आरोपींनी त्यांच्याकडून उकळले. त्यांनी परताव्याची मागणी केली. मात्र, त्यांना डवाउडवीची उत्तरे मिळाली. आरोपींनी मोबाइल बंद करून टाकले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
तर, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तोडकर रेसिडेन्सी सोसायटीत राहणाऱ्या एका ५४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीशी मोबाईलद्वारे तसेच सोशल मिडियाद्वारे संपर्क साधला. आरोपींनी त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांना वेळोवेळी २५ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना परताना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.