If Somnath Suryavanshi family does not get justice, they will take to the streets and fight, warns Manoj Jarange
विशेष प्रतिनिधी
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढू. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांनी आज परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले, परभणीमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दु:खदायी आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण केली. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये देखील त्यांना मारहाण करण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन यामध्ये जे दोषी असतील त्या पोलिसांवर देखील कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा .
जरांगे पाटील म्हणाले, बीडमध्ये घडलेला प्रकारही अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे. आरोपी आमदार असो की खासदार असो अथवा मंत्री असो तो गजाआड गेलाच पाहिजे, ही त्या कुटुंबाची मागणी आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे
मयत संतोष देशमुख यांच्या मुलीने 28 तारखेला मोर्चाचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे यामध्ये कुठलेही राजकारण करू नये. संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात कुणाला सुट्टी देणार नाही जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. सरकार या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने या प्रकरणात न्याय करावा नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच न्याय करेल. ते सरकारला परवडणारे नाही . या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालण्याचे काम देखील सरकारकडूनच केले जात आहे, त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला ताब्यात घ्यावे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी जी माहिती दिली आहे ती माहिती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली आहे. पोलीस कोठडीत असताना जर कोणत्या युवकांनी जेवण मागितले तर पोलीस कर्मचारी त्यांना मारहाण करत होते आणि आता पोट भरली आहे का अशी विचारणा करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे