विशेष प्रतिनिधी
पुणे : हॉटेलमघील बिल देण्यावरुन झालेल्या वादातून कंटेनर चालकाचा चाकाखाली चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. ( A fellow container driver was crushed to death under the wheel for paying the hotel bill)
परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५, रा. नांदेड) असे खून झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. राम दत्ता पुरी (वय २५, रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राम पुरी आणि मृत देवराये हे दोघेही संतोष पांचुदकर यांच्या कंटेनरवर चालक म्हणून काम करत होते. गुरूवारी (१३ फेब्रुवारी) ते नगर रस्त्यावरील एका गोदामात माल उतरवण्यासाठी आले होते. दोघांनी श्री गणेश वेअर हाऊसमध्ये माल उतरविला. काम पूर्ण झाल्यानंतर देवराये, पुरी आणि पोले हे तिघे रात्री साडेआठच्या सुमारास जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले.
जेवण झाल्यानंतर बिल भरण्यावरून वाद निर्माण झाला. याच वादातून देवराये याने पुरीला मारहाण केली आणि चापट मारली. यामुळे संतप्त झालेल्या पुरीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. काही वेळातच पुरीने कंटेनरचा ताबा घेतला आणि देवरायेच्या अंगावर घातला. चाकाखाली आल्याने देवरायेचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर पुरी कंटेनर घेऊन फरार झाला. वाटेत दोन ते तीन वाहनांना धडक दिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कंटेनर चालक पोले यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून आरोपीला पकडले आणि चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, परिमंडळ चारचे उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, राजेंद्र मुळीक, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पुढील तपास करीत आहेत.