विशेष प्रतिनिधी
पुणे : सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, एरंडवणे येथील कर्मचारी कै. मनोज भगत यांना गेल्या ११ महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे त्यांनी मानसिक धक्क्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पतित पावन संघटनेच्या वतीने आज संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर आणि जिल्हाध्यक्ष सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. सुरुवातीला संस्थेच्या कुठल्याही प्रतिनिधीने चर्चेसाठी पुढे न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आणि त्यांनी काही प्रमाणात तोडफोड केली.
काही वेळाने संस्थेचे अभय जोशी चर्चेसाठी आले आणि त्यांनी कै. भगत यांच्या थकित पगाराबाबत कुटुंबीयांना चेक आणि लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज भगत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी संस्थेच्या प्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे “पगार द्या अन्यथा मी फाशी घेईन” असा इशारा दिला होता. मात्र त्यावर वरिष्ठांनी “तुला जे करायचं ते कर, आम्ही कोणाला घाबरत नाही” असे निर्लज्ज उत्तर दिल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर पतित पावन संघटनेच्या वतीने संस्थेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तसेच शासनाने या संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निदर्शनात मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पू टेमघरे, माउली साठे, अरविंद परदेशी, शरद देशमुख, हराळे पाटील, विनोद बागल, अण्णा बांगर, तेजस पाबळे, सौरभ कुलकर्णी, गणेश जाधव, अक्षय बर्गे, शुभम परदेशी, साहिल बामगुडे, आदित्य बर्गे, दीपक परदेशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.